भविष्यात निधीची कमतरता पडणार नाही – आ. नमिता मुंदडां

७० कामांचा समावेश : विविध प्रभागातील रस्ते, नाल्यांची कामे लागणार मार्गी

अंबाजोगाई – राज्यातील सत्ताबदल अंबाजोगाईसाठी सकारात्मक ठरल्याचे दिसून येऊ लागले आहे. सत्ताबदल होताच आ. नमिता मुंदडा यांच्या मागणीला प्राधान्य देत शिंदे-फडणवीस सरकारने अंबाजोगाई शहरातील विकास कामांसाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहरातील जवळपास सर्वच प्रभागात विकासकामे केली जाणार आहेत.

अंबाजोगाई शहरातील अनेक प्रभागातील विकास कामांसाठी निधी देण्याची मागणी केज विधानसभा मतदार संघाच्या आ. नमिता मुंदडा यांनी राज्य शासनाकडे मागील अनेक महिन्यापासून लावून धरली होती. पत्रव्यवहार करून आणि मंत्रालयात भेटी घेऊन शासनदरबारी सदोदित पाठपुरावा सुरु ठेवला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सत्तांतर झाले आणि राज्यात भाजप पुन्हा सत्तेत आले. याचा सकारात्मक फायदा अंबाजोगाईसाठी झाला आहे. नवीन सरकारने आ. मुंदडा यांच्या मागणीला प्राधान्य देत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात विशिष्ट नागरी सेवा आणि सेवा पुरविणे अंतर्गत अंबाजोगाई शहरातील विकास कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

या निधीतून विविध प्रभागातील एकूण ७० कामे करण्यात येणार असून त्यात सिमेंट रस्ते, डांबरी रस्ते, नाल्या, लादीकरण आदी कामांचा समावेश आहे. सदरील कामे सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत करण्यात येणार आहेत. लवकरच या कामांच्या निविदा काढण्यात येणार असल्याने काही महिन्यातच शहरातील गल्लोगल्लीत दर्जेदार रस्ते तयार होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, शहराच्या विकासासाठी भरघोस निधी मंजूर केल्याबद्दळ आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. अंबाजोगाई शहर अनेक विकास कामांपासून वंचित आहे. दर्जेदार विकास कामे करून राज्यातील चांगल्या शहरांपैकी एक अशी अंबाजोगाईची ओळख निर्माण करायची आहे. शहराच्या विकासासाठी भविष्यात निधीची कमतरता पडू देणार नाही. आसे आश्वासन आ. नमिता मुंदडा यांनी दिले.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks