परळीकरांच्या स्वप्न पूर्तीकडे वाटचाल : परळी शहर बायपासचे काम पूर्णत्वाकडे; धनंजय मुंडेंचा ‘सेल्फी ऑन द रोड’

धनंजय मुंडेंनी कामाची पाहणी करून व्यक्त केले समाधान

परळी (दि. 04) – परळी शहर वासीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा व अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या परळी शहर बायपासचे काम सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून वेगाने पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. आज मंत्री धनंजय मुंडे यांनी एका कार्यक्रमासाठी जात असताना, अचानक थांबुन या कामाची पाहणी केली. यावेळी काम अत्यंत वेगाने, दर्जात्मक पद्धतीने सुरू असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. एवढेच नव्हे तर धनंजय मुंडे यांना आपण केलेल्या प्रयत्नांचे फलित पाहून, या रस्त्यावर उभारून सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही!

परळी शहर बायपास हा दोन टप्प्यात विभागलेला असून, अवजड वाहतुकीच्या दृष्टीने हा बायपास अत्यंत महत्वाचा मानला जातो. पहिल्या टप्प्यात कन्हेरवाडी ते टोकवाडी या चार किलोमीटर लांबीच्या चार पदरी रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून, यासाठी 54 कोटी रुपये निधी खर्च अपेक्षित आहे. मे. यश कन्स्ट्रक्शन या कंपनी मार्फत या रस्त्याचे काम सुरू असून, रेल्वे ओव्हर ब्रिज वगळता सुमारे 80% काम पूर्णत्वाकडे आले आहे. मागील वर्षी 3 जुलै रोजी धनंजय मुंडे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. तर दुसऱ्या टप्प्यात टोकवाडी ते संगम या रस्त्याचे सुमारे पावणे तीन किलोमीटर चे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुकीत परळीकर जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी धनंजय मुंडे हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. कोविडच्या काळात निर्बंधांमुळे काही कामांना जरी निधीची अडचण निर्माण झाली असली, तरी त्यांनी मूळ विकासकामांना कुठेही ब्रेक लागू दिला नाही.

धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून परळी शहर बायपासचा एक टप्पा आता पूर्णत्वाकडे आला असून, यामुळे शहरातून होणाऱ्या अवजड वाहतूक व दळणवळण सुविधेत आमूलाग्र सकारात्मक परिणाम होणार आहे.

मागील सरकारच्या काळात सुमारे 4 वेळा वेगवेगळ्या मंत्री महोदयांना परळीत बोलावून 4 भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करून तत्कालीन पालकमंत्र्यांना बायपासचे काम सुरू देखील करता आले नव्हते. त्यामुळेच की काय, या कामाचे पूर्णत्वाकडे जात असलेले रूप पाहून धनंजय मुंडे यांना रस्त्यावर सेल्फी घ्यायचा मोह आवरला नसावा!

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks