संस्कार भारतीचा गुरुपूजन सोहळा दिमाखात पार पडला

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )

नुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त दि.२० जुलै रोजी संस्कार भारती माजलगाव समितीकडून गुरुपुजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संस्कार भारतीच्या सहा अनिवार्य कार्यक्रमांपैकी गुरुपूजन हा एक कार्यक्रम होता.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून धाराशिव येथील कविवर्य, गीतकार, चित्रकार अशी ख्याती असलेले श्री. राजेंद्र अत्रे व सौ.विजया अत्रे यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माजलगाव भूषण, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, कवीवर्य श्री.प्रभाकर साळेगावकर यांनी भूषविले. या कार्यक्रमाची सुरूवात व्यास यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून सुरू झाली. यानंतर दिगंबर महाजन व चैतन्य आहेर यांच्या चमूने संस्कार भारतीच्या ध्येय गीताचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मिता लिंबगावकर यांनी केले.

या कार्यक्रमासाठी देवगिरी प्रांताच्या मातृशक्ती प्रमुख स्नेहलताई पाठक, लच्छी चित्रपटाचे दिग्दर्शक विष्णू उगले, ॲड.सतीश धुतडमल, संस्कार भारती बीड शाखेचे अध्यक्ष प्रमोद वझे व सचिव सुरेश भानप यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी आझादी का अमृत महोत्सव निमित्त केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयात कडून घेण्यात आलेल्या भुअलंकरण स्पर्धेत देवगिरी प्रांतातून प्रथम पारितोषिक मिळवलेल्या सुरेश भगवानराव देशपांडे यांचा व सहभागी कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचे समायोजित मनोगत व्यक्त केले गेले. व यानंतर प्रमूख अतिथी श्री.अत्रे यांनी फुल, सैनिक अशा विविध कवितांचा वर्षाव करून रसिकांची मने जिंकली. व कार्यक्रमाचा समारोप हा कवीवर्य श्री.प्रभाकर साळेगावकर सरांच्या बहारदार कवितांनी झाला. रसिक श्रोत्यांनी यावेळी टाळ्यांच्या कडकडाटात दोन्ही पाहुण्यांना भरपूर अशी दाद दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरीताई देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन लता जोशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी संस्कार भारतीच्या प्रत्येक कार्यकारीणी सभासदांचा व सदस्यांचा मोलाचा वाटा होता.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks