मोफत उपचारांचा कायदा झालाच पाहिजे; या मागणीसाठी रुग्ण हक्क परिषदेने केले रास्ता रोको आंदोलन!

पुणे विशेष : रुग्ण हक्क संरक्षण कायदा झालाच पाहिजे, रुग्णांना न्याय मिळालाच पाहिजे, रुग्ण हक्क परिषदेचा विजय असो, मोफत उपचार आमच्या हक्काचे – नाही कुणाच्या बापाचे अशी जोरदार घोषणाबाजी करत रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीने आज अलका टॉकीज चौकात अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोखून धरला.

नागरिकांना मोफत उपचार मिळवण्यापासून मज्जाव करणे, रुग्णांना शासकीय निधी मिळविण्यापासून अडवणूक करणे, बिल भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून दोन दोन चार चार दिवस रुग्णांचा डिस्चार्ज जाहीर झाल्यावरही अडवणूक करणे, रुग्णांना डांबून ठेवणे, रुग्णांचा प्रचंड अपमान करणे अशा बाबी सर्रास घडत आहेत, यासाठी दर्जेदार उपचार मोफत मिळावेत म्हणून फौजदारी संहितेचा रुग्ण हक्क संरक्षण कायदा झाला पाहिजे, यासाठी रुग्णाक परिषद पुणे शहर कमिटीच्या वतीने आज पुण्यातील अलका टॉकीज चौक येथे लक्ष्मी रस्ता अडवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनामध्ये रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण, परिषदेचे अजय भालशंकर, पुणे शहर अध्यक्ष अपर्णाताई साठे, पुणे शहर उपाध्यक्ष संजय कुरकुटे, सचिव श्रीनिवास कुलकर्णी, प्रभा अवलेलू, कविता डाडर, यशवंत भोसले, राज्य सचिव सोहनी डांगे, बाळासाहेब ननावरे, सिद्धार्थ ओव्हाळ, नरहरी भोसले, हनुमंत फडके, यल्लप्पा वलदोर, आशा खतीब, रिपब्लिकन युवा मोर्चाचे, पक्षनेते राहुल डंबाळे यांनी तसेच लहुजी समता परिषदेचे अध्यक्ष अनिल हातागळे, प्रहार जनशक्ती पक्षाचे नयन पुजारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धनंजय टिंगरे यांनी उपस्थित राहून पाठिंबा व्यक्त केला.

यावेळी उमेश चव्हाण म्हणाले की, नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे काम प्रचंड निराशा जनक पद्धतीने सुरू आहे. रुग्णाला मिळणारा 30 हजार रुपये निधी हा प्रचंड तुटपुंजा आहे. आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचे सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतरही मुख्यमंत्र्यांचा सहायता निधी मिळत नाही. यासाठी ही आजचे आंदोलन केले आहे.

रुग्ण हक्क संरक्षण कायदा झालाच पाहिजे यासाठी सर्व कार्यकर्ते अत्यंत आग्रही होते. दरम्यानच्या काळात या आंदोलनाची तीव्रता वाढणार असून पुण्यातील प्रत्येक चौकामध्ये रुग्ण हक्क परिषद कायदा झालाच पाहिजे यासाठी आंदोलन छेडणार आहे, अशी माहिती अजय भालशंकर यांनी दिली.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks