केज तालुक्यातल्या “बनसारोळा” गावात ऑट्रासिटीचा गुन्हा दाखल

केज दि. 30 – दोघांचे लागलेले भांडण पाहून सोडविण्यास आलेल्या तरुणास जातीवाचक शिवीगाळ करीत कारच्या स्टील पट्टीने डोक्यात व पाठीत मारहाण करुन डोके फोडले. तर कारची तोडफोड करीत 80 हजार रुपयांचे नुकसान केल्याची घटना केज तालुक्यातील बनसारोळा येथे घडली. याप्रकरणी एक जणांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल झाला आहे.

केज तालुक्यातील बनसारोळा येथील गणेश सतिष जगताप (वय 22 ) हा तरुण 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या गावातील बाबा हॉटेलवर चहा घेत असताना अनंत बब्रुवान माने हा दुचाकीवरून भरधाव वेगात विजय लिंबाजी धायगुडे यांच्या घराकडे गेल्याचे पाहून गणेश हा त्याच्या पाठीमागे गेला. विजय धायगुडे यास अनंत माने हा रागाने बोलत असताना गणेश जगताप याने त्यांचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या अनंत माने याने तुझा काय संबंध असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करीत कारची स्टील पट्टी काढून गणेश जगताप याच्या डोक्यात व पाठीत मारुन डोके फोडले.

जीवे मारण्याची धमकी देत विजय धायगुडे यास लाथाबुक्यांनी छातीत व पोटात मारहाण करीत विजय याच्या कारची मागची काच, डॅशबोर्ड, हेडलाईट, बॅकलाईट व साईड आरसे फोडुन 80 हजार रुपयांचे नुकसान केले. अशी फिर्याद गणेश जगताप याने दिल्यावरून अनंत माने याच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे करीत आहेत.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks