बीड: जिल्ह्याच्या विकासाची पायाभरणी सुंदररावजी सोळंके यांनी केली

सुंदरराव सोळंके यांच्या जयंतीनिमित्त ना.अजितदादा पवार यांचे प्रतिपादन

माजलगाव / (वर्तमान महाराष्ट्र)

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. सुंदररावजी सोळंके यांचे शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार, औद्योगिक, क्षेत्रात खुप मोठे कार्य असून माजलगावसह बीड जिल्ह्याच्या विकासाची पायाभरणी सुंदरराव सोळंके यांनी केली असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुंदररावजी सोळंके यांच्या जयंती निमित्त बोलताना व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत सुंदररावजी सोळंके यांच्या जयंतीनिमित्त सुंदरराव सोळंके महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.याकार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आ. डी. के. देशमुख होते. यावेळी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्याने ध्वजारोहण नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ.प्रकाश सोळंके, आ. राधाकृष्ण होके पाटील, माजी आ. अमरसिंह पंडित, माजी आ. पृथ्वीराज साठे, जयसिंह सोळंके, प्रदीप चव्हाण, विजय सोळंके, ऍड. भानुदासराव डक, प्राचार्य डॉ. जी. के. सानप यांची प्रमुख उपस्थिती होती. दि १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती दिन व दिवंगत सुंदरराव सोळंके यांच्या जयंती च्या संयुक्त कार्यक्रमात बोलताना ना. अजित पवार म्हणाले की,

मराठवाड्याची भूमी संतांची वीरांची आहे. या भूमीला संघर्षाचा इतिहास लाभलेला आहे मराठवाड्याला जे मिळाले ते संघर्षातून नव्या पिढीला स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास ज्ञात होणे गरजेचे आहे.परंतु मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाबद्दल अनास्था दाखवण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. महाविकास आघाडी सरकारने याबाबत विविध उपक्रम राबविण्यासाठी७५ कोटीची तरतूद करून समिती नेमली होती परंतु सरकार बदलल्यानंतर नव्याने आलेल्या राज्य सरकारने समिती बरखास्त करून या गौरवशाली लढ्याबद्दल अनास्था दाखवली आहे.

सुंदररावजी सोळंके यांच्या कार्या बद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, सुंदरराव सोळंके यांनी मराठवाड्यामध्ये जलसंधारणाच्या माध्यमातून हरितक्रांती घडवण्याचं स्वप्न पाहिले आणि ते त्यांनी पूर्णत्वास नेले. माजलगाव धरणाची उभारणी त्यांनी केली त्यामुळे हजारो हेक्टर शेत जमीन ओलिताखाली आली. तेलगाव येथे साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घरात आर्थिक सुबत्ता आणण्याचे काम सुंदरराव सोळंके यांनी केल त्यांच्या विकासाभिमुख कार्यामुळे या भागात विकास साध्य झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ. प्रकाश सोळंके यांनी केले.

यावेळी अध्यक्षीय समारोप करताना माजी आमदार डी. के. देशमुख म्हणाले की मराठवाड्याचा अनुशेष बाकी असून तो पूर्ण करावा असे सांगून त्यांनी दिवंगत सुंदररावजी सोळंके यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. एम. ए. कव्हळे यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. जी. के. सानप यांनी मांडले या कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थीनी, माजी विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी व प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती होती.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks