अथक प्रयत्नानंतर अखेर डॉ. फपाळ यांचा मृतदेह सापडला

शोध कार्य करत असताना एन.डी.आर.एफ. जवान राजशेखर मोरे यांचा मृत्यू

माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )
दि. १८ रविवार रोजी सकाळी माजलगाव धरणामध्ये पोहण्यासाठी गेलेले तेलगाव येथील डॉ. दत्तात्रय फपाळ हे पोहत असताना पाण्यात बुडाले त्यांचा मृतदेह अथक प्रयत्नानंतर आज दि. १९ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मच्छीमारांनी गळ टाकून शोध घेत असताना त्यांचा मृतदेह सापडला.
तालुक्यातील बेलोरा येथील डॉ. दत्तात्रय फपाळ वय ४२ वर्षे यांचे तेलगाव येथे अजिंक्य हॉस्पिटल असून ते गेल्या काही दिवसापासून माजलगाव येथे वास्तव्यास होते. ते रोज सकाळी आपल्या सहकाऱ्या सोबत माजलगाव धरणामध्ये पोहण्यास जात होते रोजच्या प्रमाणे ते माजलगाव धरणावर रविवारी दि. १८ सप्टेंबर रोजी पोहण्यास गेले ते पोहत पोहत खूप दूर गेले परत येताना त्यांना धाप लागल्यामुळे ते पाण्यामध्ये बुडाले. याची माहिती प्रशासनामार्फत आपत्ती व्यवस्थापन पथकाला देण्यात आल्यानंतर माजलगाव येथे आपत्ती व्यवस्थापन पथकाने पाचारण करत त्यांनी त्यांचा शोध सुरू केला. मात्र अंधार पडल्यामुळे शोध कार्यात अडथळा निर्माण झाला यामुळे शोध कार्य संध्याकाळी थांबवण्यात आले.
आज कोल्हापूर येथील आपत्ती व्यवस्थापन पथक दाखल झाले याच पथकातील दोन जवान डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर सह पाण्यात गेले असता मच्छीमारांनी लावलेल्या जाळ्यामध्ये ते अडकले व त्यातील एक जवानास पाण्या बाहेर काढून त्यास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र दुसरा जवान राजशेखर मोरे ( ३० ) हे तीन तास पाण्याबाहेर आले नसल्याने त्यांचा शोध सुरू करण्यात आला. यावेळी स्थानिक मच्छीमार, बीड, परळी, कोल्हापूर येथील पथकाने त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या शोध मोहिमेत शोध कार्य करणारे एन. डी. आर. एफ. चे कोल्हापूर पथकातील जवान राजशेखर मोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या जवानाचा मृतदेह दुपारी सव्वा एकच्या दरम्यान बाहेर काढण्यात आला. तर अथक प्रयत्नानंतर सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान डॉ. दत्तात्रय फपाळ यांचा मृतदेह सापडला असून या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शहरासह तालुक्यावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks