बनावट पिस्तूल व कोयत्याच्या धाकाने दहशत निर्माण करणाऱ्या एकाला अटक

नारायणगाव पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने केला बनावट पिस्तूल व कोयता जप्त

प्रतिनीधी विशाल सरवदे

नारायणगाव (पुणे): बनावट पिस्तूल व कोयत्याच्या धाकाने दहशत निर्माण करणाऱ्या एकाला नारायणगाव पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली, अशी माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. अनिल सुनील जाधव (रा. ठाकरवस्ती, वारुळवाडी, ता. जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारुळवाडी येथे ठाकरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी (दि. २३) रात्री ११ वाजता अनिल जाधव हा हातात कोयता फिरवून कमरेला पिस्तुल लावून नागरिकांना धमकावत होता. याबाबतची माहिती मिळताच नारायणगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी विनोद धुर्वे, दीपक साबळे, मंगेश लोखंडे, संदिप वारे, अक्षय नवले, शैलेश वाघमारे, दत्ता ढेंबरे आदी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अनिल हा नागरिकांना धमकावताना दिसून आला. त्यानुसार पोलिसांनी अनिलला ताब्यात घेतले. त्याच्याकडून बनावट पिस्तूल व कोयता जप्त केला. पोलिस हवालदार ताऊजी दाते हे पुढील तपास करत आहेत.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks