मराठवाड्यातील शेतक-यांचा आगळा वेगळा सण “येळवस ” – नाईकवाडे दीपक

वेळा अमावास्या या शब्दाला कसलाच अर्थ नाही. तसेच वेळ आमावास्या दिवशी पांडव पुजन केल्या नंतर शेतामध्ये आंबिल व खिचड्याची चर शिंपत आसताना “ओलगे ओलगे चालन पलगे” हर हर हर महादेव अशा हाळी देतात त्याचा पण अर्थ माहीत करुन घेण्याचा प्रयत्न केला असता कोणीही त्याचा अर्थ सांगु शकला नाही. पुर्वापार चालत आलेली प्रथा आम्ही पाळतो असे उत्तर मिळते.
“यळ्ळा आमाशी” या कानडी शब्दाचा अपभ्रंश वेळा आमावास्या असा आसावा.
कानडीत ” यळ्ळा” म्हणजे तीळ.
” आमाशी ” म्हणजे आमावास्या.
यळ्ळा आमाशी म्हणजे तीळाची अमावास्या. त्याचाच अपभ्रंश वेळा अमावास्या असा झाला. खेड्यातील काही जण याला यळवस देखील म्हणतात.
वेळा आमावास्या हा सण कर्नाटकातील कलबुर्गी व बिदर जिल्हयासह महाराष्ट्रातील कानडी भाषिक भागात म्हणजे कर्नाटक राज्याला लागून असलेल्या धाराशिव ( उस्मानाबाद), लातूर व सोलापूर येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात साजरा करतात.
हा सण मार्गशीर्ष अमावास्याला साजरा करतात. ही अमावास्या साधारणपणे १५ डिसेंबर ते १५ जानेवारी या दरम्यान येते. या काळात या भागात थंडी असते. म्हणून या काळात उष्ण तीळ खातात व जेवणात ही वापरतात.
या दिवशी शेतकरी तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी, तीळ लावलेले लहान उंडे, तसेच हरभऱ्याचे ढाळे, तुरीच्या ओल्या शेंगा, व इतर रब्बी हंगामात उपलब्ध होणारा सर्व भाजीपाला, हिरव्या मिरच्या,बोर, चिंच वगैरे योग्य प्रमाणात मिसळून भाजी तयार करतात,त्याला “भज्जी” म्हणतात. वांग्याचे भरीत काही जण करतात.
ज्वारी चे पीठ ताकात कालवून आंबवून ” आंबील” तयार करतात. गुळ घालून केलेली “गव्हाची खीर” देखील असते सोबतीला शेंगदाण्याच्या पोळ्या, दुध, तुरीच्या दाळीचे सप्पक वरणावर तुपाची धार
हा स्वयंपाक स्त्रिया रात्रभर तयार करून सकाळी १०/११ वाजता बैलगाडीतून शेतात नेऊन झाडाखाली ज्वारीच्या कडब्यांचे खोपटे (कोप) करुन त्यात ५ दगडांची पांडव पुजा करुन वन भोजनाची पंगत होते. शेतात काम करणारे गडी, शेत मजूर, ज्यांना शेती नाही अश्या मित्रांना नातेवाईकांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते.
दिवसभर शेतात फिरुन संध्याकाळी घरी परत येतात…!! अशी वेळ आमावासेची मजा आनुभव घेण्यासारखी आसते. उगीच नाही विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सुध्दा वेळ आमावास्या व बैल पोळ्याच्या सणाला व्यस्त वेळापत्रकातुन वेळ काढुन आपल्या मुळ गावी बाभळगावला यायचेच.
वेळ आमावासेच्या हार्दिक शुभेच्छा
नाईकवाडे दीपक, निलंगा

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks