Akshy Bhalerao: बौद्ध तरुण अक्षय भालेराव च्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या – विजय साळवे

माजलगाव / (प्रतिनिधी ) नांदेड जिल्ह्यातील बोंडार येथील बौद्ध तरून अक्षय भालेराव यांची हत्या जातीयवादी गाव गुंडांनी केली असून त्या गावगुंडांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विजय साळवे यांनी केली आहे . या बाबत अधिक माहिती अशी की, बोंडार हे गाव नांदेड पासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर आहे. एवढ्या मोठ्या शहराजवळ हे गाव असूनही तेथे आतापर्यंत ज्या महामानवाच्या संविधानाच्या लोकशाहीमुळे भारतातील सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने व आनंदाने आपले सर्व हक्क अधिकार अबाधित ठेवून जगतात त्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्या जात नव्हती. परंतु नव्या विचाराचा सुशिक्षित तरुण अक्षय भालेराव यांनी प्रथमच या गावात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती गावातील सर्व तरुणांना सोबत घेऊन साजरी केली. आणि तेव्हापासून गावातील जातीयवादी मनुवादी मानसिकतेच्या लोकांच्या पोटात दुखू लागले होते. त्याचा राग मनात धरून पूर्व प्लॅनिंग करून त्या गावातील गावगुंडांनी अक्षय भालेराव या बौद्ध तरुणाची अमानुष हत्या केली. अक्षय भालेराव हे नव्या दमाचे सुशिक्षित बौद्ध तरुण गावातील समविचारी युवकांना सोबत घेऊन विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रथमच जयंती साजरी केल्याने मनुवादी जातीयवादी लोकांच्या पोटात दुखू लागले होते.

त्यांनी अक्षय भालेराव यांना मारण्याचा नियोजनबद्ध कट केला. एका वरातीच्या मिरवणुकीचे निमित्त काढून हातात नंग्या तलवारी काठ्या घेऊन गावात वरातीची मिरवणुक फिरत होती आणि अक्षय भालेराव हा तरुण दिसला तिथेच त्याच्यावर तलवारीने सपा सप वार करून त्याची अमानुषपणे हत्या करण्यात आली व हत्या करताच लाईटचा डीपी बंद करून गावात अंधकार पसरवला एवढंच नाही तर बुद्ध वस्तीवर हल्ला करण्याचाही त्या मनुवाद्यांचा कट होता. एवढी मोठी घटणा गावात होऊनही जिम्मेदार लोकांनी त्या मारेकऱ्यांना सुसाट मोकळे सोडले होते. गावातील पोलीस पाटील , सरपंच, कोतवाल यांनी वेळीच प्रशासनाला नंग्या तलवारीची मिरवणूक निघाल्याचे कळविले असते तर हा अमानुष हत्येचा कट रोखता आला असता. हे जातीवादी मनूवादी गुंड त्याची हत्या करूनच थांबले नाहीत तर बौद्ध समाजावर बहिष्कार टाकण्याचा त्यांचा प्रयत्न ही होता. अशा या गावगुंड प्रवृत्तीच्या लोकांना न्यायालयाने फाशी देण्यात यावी व मयत अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावे.

कारण या घटणेने त्यांचं कुटूंब व इतर बौद्ध समाजात दहशत निर्माण झाली असून बौद्ध समाज भयभीत झालेला आहे. त्यांना पोलीस प्रशासनाने संरक्षण द्यावे तसेच भालेराव कुटुंबीयां पैकी एकाला शासकीय नोकरीत ताबडतोब सामावून घ्यावे. अक्षय भालेराव च्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी तसेच बोंडार या गावाची ग्रामपंचायत बरखास्त करून त्याचा निधी रोखण्यात यावा आणि जे लोक अपराधी आहेत त्यांची मालमत्ता जप्त करून त्यांच्या घरादारावर उत्तर प्रदेश सरकारच्या धरतीवर बुलडोझर फिरवावे. या व इतर मागण्या शासनाने येत्या पाच दिवसात मंजूर नाही केल्या तर उग्र आंदोलन करण्यात येईल या मध्ये जे काही परिणाम होतील त्याचे जबाबदार प्रशासन असेल असे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विजय साळवे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे सांगितले आहे . या वेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे भीमसैनिक उपस्थित होते.

वर्तमान महाराष्ट्र

News & True Story

Top
Enable Notifications OK No thanks